Thursday, 18 June 2020

 मरता केव्हा ही येतं... फक्त जन्म आहे तोवर जगता आलं पाहिजे...!!!



मरता केव्हा ही येतं...
फक्त जन्म आहे तोवर जगता आलं पाहिजे...!!!

आवडलं.
मरता तर केव्हा ही येतं.
जन्म आहे तोवर ताकद मनात असली पाहिजे.ठेवली पाहिजे. जगली पाहिजे. आणि खरं म्हणजे अनुभवली पाहिजे. 
कारण आपण आहोतच जबरदस्त. आहोतच भारी. ज्याने बनवलं त्याने तसं खास बनवलंच आहे आपल्याला.
त्यामुळे जोवर जन्म आहे तोवर त्याचा आदर राखायलाच हवा.

जोवर जन्म आहे तोवर किंमत समजली पाहिजे.
स्वतःची.
आयुष्याची.
माणसांची.
कामाची.
जीवनाची.

इथे खूप काही करण्याची संधी आहे.
इथे माणसांचं निर्भेळ, निर्मळ प्रेम तुम्हाला मिळत राहील.
ती केवढी मोठी संपत्ती आहे. ज्याला हे सगळं नाही मिळत त्याला विचारून पाहिलत की समजेल.

उघड्या डोळ्यांनी पाहाल तर कळेल...
की सगळं ठिकठाक आहे..
आपण धडधाकट आहोत.
संधी वाट पाहताहेत.
कष्ट करायला हा दिवस उपलब्ध झालाय.
जवळच्यांचं प्रेम कोणत्याही अटीशिवाय बरसतय.

आणि श्रीमंती बद्दल काय बोलायचं आपल्या..
हवं तेवढं सुंदर बोलू शकतो आपण ही संपत्ती आहे आपली.
आपल्याला जमेल तेवढी मदत जरूर आपण करू शकतो आपण समोरच्याची ही संपत्ती आहे आपली.
कष्टांच्या जोरावर हवं ते शिकू शकतो आपण. कित्ती व्यासंग उपलब्ध आहे जगभर ..मनापासून मजा घ्यायचीच म्हटल्यावर करायला किती गोष्टी उपलब्ध आहेत. खरंच ..ही खूप मोठी संपत्ती आहे आपली..
यातलं जे जे बहारदार वाटेल तेवढं टिपायचं.
माणसांवर प्रेम करण्याची अफाट ताकद आपल्याला भेटली आहे.
मनापासून तुमच्यातलं प्रेम आजमावून तर पाहा. ही सारी दुनिया तुमची दोस्त होऊन जाईल.

आणि हे सगळं करण्यापूर्वी एक करा..
आजचा दिवस हा बहार आहे.
तो मनापासून जगा.. मजा घ्या त्याची. 
विचारांनी धडधाकट होण्याकडे लक्ष जरूर द्या.
माणूस म्हणून बहारदार व्हायचंय आपल्याला हे जरूर ठरवा.
तुम्ही मजा घ्यायला लागलात ना आपल्या कामाची, स्वतःची, आजूबाजूच्या माणसांची, नवनवीन गोष्टी try करून पाहण्याची की आपोआप सगळं मस्त होईल.. भारी होईल...

खरंय की कधी अडचणीचे प्रसंग येतात. कधी हव्या त्या गाठी लवकर बसत नाहीत. हव्या त्या गोष्टी जुळून नाहीत येत. कधी शब्दात व्यक्त करता येत नाही असं आणि कशानेही कदाचित भरून निघत नाही असं काहीतरी अनुभवतो आपण.
पण हे असे प्रसंग ही खरंतर बरच काही शिकवून जातात आपल्याला. काही वेळा या दोन वेळच्या अन्नातच समाधान मानून काढायच्या असतात. काही वेळा प्रयत्नांची रंगत अनुभवत काढायच्या असतात. काही वेळा सगळं हळू  झालेलंच बरं असतं अन काही वेळा अशा असतात की जेव्हा आपल्या हातात आहे तेवढं केल्यावर बाकी सगळं सोडून देण्यातच खरा अर्थ असतो. काही वेळा प्रश्न काळाच्या कसोटीवर उत्तर भेटण्यासाठी सोडून देऊन काढायच्या असतात अन काही वेळा ते दुःख पचवून जे झालं त्या  गोष्टी च्या स्मरणात आयुष्य जगण्याची नवी शपथ घेऊन त्या घडलेल्या घटनांना, गोष्टींना एक नवं वचन द्यायच्या ,नवी सुरुवात करायच्या.. स्वतः ला ,आयुष्याला पुन्हा एक नवी संधी द्यायच्या प्रार्थनीय वेळा  असतात.....

म्हणून नवी सुरुवात तर अगदीच करायला हवी.. बरं वाटतं.. आपल्याला अन आपल्या आत असलेल्या त्या असंख्य जिवलगांना ....!!!
आपण सुंदर झालो ना की जग आपोआप मस्त होऊन जातं.
आपलं काम हीच आपली जगाला सेवा आहे. त्यामुळे ते अधिकाधिक चांगलं करणं हाच समाजाचा, देशाचा, जगाचा विकास आहे.
आपले विचार बहारदार होणं हेच संस्कृती जपणं आणि जगणं आहे. चांगल्या विचारांच्या नशेत राहणं कधीही चांगलं.विचारच आपल्याला घडवतात दिशा देतात आनंद देतात. त्यांच्याशी आयुष्यभराची मैत्री केव्हाही चांगली.. नाही का..?

तेव्हा भरपूर मस्त राहा. स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा. भरपूर वेगवेगळं काम करा. कष्ट करा. मजा घ्या कामाची.  भरपूर मदत ही करा लोकांची. या जगाच्या विविधतेची मजा घ्या आणि आत मध्ये जो आनंद लपलाय त्यात मश्गूल राहायला विसरू नका..

Comeon. Give yourself a chance.
Now.

- दोस्त





Sunday, 14 June 2020

तू स्वतःशी हट्ट धर हो प्रेरणेचा स्रोत तू!!!



तू स्वतःशी हट्ट धर हो प्रेरणेचा स्रोत तू |
हो स्फूर्तीदायक अन तरीही सहजसुंदर गीत तू||
तू हो उद्याचे स्वप्न अन हो या नभीचा सूर्य तू |
दे स्फूर्तीचा तू किरण दे तेजोनिधीचा स्पर्श तू ||
हो यज्ञ हो तू यत्न अन हो चंद्रशीतल आग तू |
पेटून दे तुझिया कृपेने संकटे कर भस्म तू ||
तू असावे एक तारा अढळ हो हो ध्रुव तू |
तू मोहरावे पाझरावे दे जगाला प्रीत तू ||
तव लाभले मज लाभले रे खूप आहे जीवनी |
बघ शोधूनी पाहू तरी पण काय आहे आत्मनी ||
या शोधण्याच्या अंतरंगी भेटूया विश्वामध्ये |
मग परतुया घेऊन गंध त्या कळ्यांना उमलुनी ||
दे स्वतःला एक शब्द वचन दे अन एक धर्म |
जाणूनी सांभाळ रे तू जीवनी मग तेच मर्म ||
शेवटी उरतोच राजा या मनीचा भावरंग |
निर्मळाचा तू मनाला लागू दे वेडाच छंद ||
........... लागू दे वेडाच छंद ||||

Saturday, 6 June 2020

''महायोगी छत्रपती शिवाजी महाराज"

" महायोगी छत्रपती शिवाजी महाराज"🙏





भगवान चिलेंचं एक व्याख्यान ऐकत होतो. आता नेमका किल्ला आठवत नाही. पण त्यांनी  हा किस्सा सांगितल्याचं आठवतं.. एका अत्यंत घनदाट ठिकाणी बऱ्याच उंचीवर महाराजांनी एक किल्ला बांधलेला आहे. त्या ठिकाणी जायला ते निघाले तेव्हा त्या काळात तिथे जायला परवानगी होती. आता परवानगी नाही. चिलेंनी सांगितलं, " आम्ही तिथे जायला निघालो. काही साथीदार सुरुवातीच्या टप्प्यातच गार झाले. मग मी आणि आणखी एक असे दोघे जण पुढे चालत राहिलो. शेवटी गडावर पोचल्यावर असं काही जाणवलं जे मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. मी देवादिकांना मानत नाही. पण त्या तशा ठिकाणी बांधलेला किल्ला पाहून महाराजांच्या ठायी वा त्या वातावरणात असलेल्या दैवी ऊर्जेचा संचार मला जाणवला. खरंच....त्या महाराजांना मुजरा, मुजरा आणि केवळ मुजराच"

अंतरंगातल्या उर्जतत्वाचा व्यापक अभ्यास भारतीय अध्यात्मशास्त्राने केलेला आहे. किंबहुना आपण उर्जतत्व आहोत अन त्याचा अनुभव आपण या जन्मात घेतला पाहिजे जेणेकरून जीवनावरील सगळं मळभ दूर होऊन प्रखर ऊर्जेचा अनुभव येतो अन आपण निर्भीडपणे समाजाच्या कामी येण्यासाठी खर्च व्हायला आत्मविश्वासाने पात्र ठरतो अशी अध्यात्म शास्त्राची एक आग्रही शिकवण आहे. 
या अनुषंगाने एक व्यक्ती म्हणून मला शिवराय आकर्षित करतात. बाळकडू जरूर मिळाले, वातावरण जरूर मिळालं, अन्यायाचा प्रतिशोध घेऊन त्यावर मात करण्याची जिद्द निर्माण झाली...
पण ही ऊर्जा हृदयात अखंड सळसळत राहण्यासाठी महाराजांची दिनचर्या कशी असेल हा प्रश्न मला पडतो.
आई भवानीचं अखंड स्मरण होतं. आत्मतत्वाचं अखंड स्मरण होतं. "गळ्यामध्ये चौसष्ट कवड्यांची माळ, भाळावरती चंद्रकोर , माथ्यावर जिरेटोप, हातातलं कडं, कानातली कुंडलं, शोभून दिसणारी कोरीव दाढी, कमावलेली आखीव रेखीव शरीरयष्टी, शोभणारी राजवस्त्रे, पायातल्या मोजड्या असं मोहवून टाकणारं जसं रूप होतं त्याहून ही मोहून टाकणारं महाराजांचं अंतरंग होतं".
आणि ते अंतरंग म्हणजे उर्जातत्व. महाराज साधक होते. योगी होते. महायोगी होते. 'तो भगव्या धुंडीचा जोगी' हे कवी उनाड यांचे शब्द मला इथे समर्पक वाटतात. जोगी होते महाराज. महाराजांची एक ध्यानमग्न  मूर्ती कर्नाटकातल्या एका ठिकाणी पाहायला मिळते.  अंतरंगातल्या उर्जातत्त्वाशी अखंड एकरूप असे ते जगले. " क्षत्रिकुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय" म्हटलं की प्रखर ऊर्जा आजही  आपल्यामध्ये सळसळते याचं कारण तेच.

अशी माणसं माणसं नसतातच. साक्षात ऊर्जेचं प्रकट रूप असतात. आणि "धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे" या भगवंतांच्या उक्तीप्रमाणे पुन्हा एकदा उर्जतत्वाची, न्यायाची, समानतेची, मानवतेच्या धर्माची स्थापना करायला पुन्हा पुन्हा या न त्या रुपात जन्म घेतात. अन् अशावेळी ' परित्राणाय साधुनाम, विनाशाय च दुष्कृतानाम' ही उक्ती सार्थ ठरवत चांगल्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करतात अन दुर्जनांचा अगदी संहार घडवून आणतात..

खरंच...
"आम्ही आतल्या शत्रूंशी लढतो, तुम्ही बाहेरच्या शत्रूंशी लढा" हे तुकोबारायांचं वचन खरं ठरवत एका जोग्या सारखे अंतरीच्या अखंड ऊर्जेने महाराज बाहेरच्या नादान शत्रूंशी एक महाभारत अत्यंत स्थिरतेने ऊर्जेने अन आपल्याला काय ऊभ करायचंय या अखंड जाणीवेने लढत राहिले. त्यांचं वैर अधर्माशी होतं. म्हणून तर माणूस म्हणून शत्रूचाही त्यांनी सन्मानच केला.
त्यांचं जीवन हे धगधगतं अग्निकुंड आहे. ते आपल्याला ऊर्जा देतच राहील. देतच राहील. आणि जेव्हा जेव्हा अधर्म माजेल..महाराज पुन्हा पुन्हा या न त्या रुपात अवतरत राहतीलच....!!

छाती केसरीची दृष्टी गरुडाची गती हरणाची,
ऐसा राजा
देह राजीयाचा प्राण योगियाचा मूळ कैलासाचे ,
ऐसा राजा
 मातीसाठी युद्ध मांडतो रक्त सांडतो ,
ऐसा राजा
 जीव वाहतो जीव लावतो जीव रक्षितो,
ऐसा राजा

अशा आपल्या हृदय सिंहासनावर विराजमान असलेल्या राजाला मुजरा मुजरा मुजरा....!!!!!
✨
शिव राज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!!