Saturday, 6 June 2020

''महायोगी छत्रपती शिवाजी महाराज"

" महायोगी छत्रपती शिवाजी महाराज"🙏





भगवान चिलेंचं एक व्याख्यान ऐकत होतो. आता नेमका किल्ला आठवत नाही. पण त्यांनी  हा किस्सा सांगितल्याचं आठवतं.. एका अत्यंत घनदाट ठिकाणी बऱ्याच उंचीवर महाराजांनी एक किल्ला बांधलेला आहे. त्या ठिकाणी जायला ते निघाले तेव्हा त्या काळात तिथे जायला परवानगी होती. आता परवानगी नाही. चिलेंनी सांगितलं, " आम्ही तिथे जायला निघालो. काही साथीदार सुरुवातीच्या टप्प्यातच गार झाले. मग मी आणि आणखी एक असे दोघे जण पुढे चालत राहिलो. शेवटी गडावर पोचल्यावर असं काही जाणवलं जे मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. मी देवादिकांना मानत नाही. पण त्या तशा ठिकाणी बांधलेला किल्ला पाहून महाराजांच्या ठायी वा त्या वातावरणात असलेल्या दैवी ऊर्जेचा संचार मला जाणवला. खरंच....त्या महाराजांना मुजरा, मुजरा आणि केवळ मुजराच"

अंतरंगातल्या उर्जतत्वाचा व्यापक अभ्यास भारतीय अध्यात्मशास्त्राने केलेला आहे. किंबहुना आपण उर्जतत्व आहोत अन त्याचा अनुभव आपण या जन्मात घेतला पाहिजे जेणेकरून जीवनावरील सगळं मळभ दूर होऊन प्रखर ऊर्जेचा अनुभव येतो अन आपण निर्भीडपणे समाजाच्या कामी येण्यासाठी खर्च व्हायला आत्मविश्वासाने पात्र ठरतो अशी अध्यात्म शास्त्राची एक आग्रही शिकवण आहे. 
या अनुषंगाने एक व्यक्ती म्हणून मला शिवराय आकर्षित करतात. बाळकडू जरूर मिळाले, वातावरण जरूर मिळालं, अन्यायाचा प्रतिशोध घेऊन त्यावर मात करण्याची जिद्द निर्माण झाली...
पण ही ऊर्जा हृदयात अखंड सळसळत राहण्यासाठी महाराजांची दिनचर्या कशी असेल हा प्रश्न मला पडतो.
आई भवानीचं अखंड स्मरण होतं. आत्मतत्वाचं अखंड स्मरण होतं. "गळ्यामध्ये चौसष्ट कवड्यांची माळ, भाळावरती चंद्रकोर , माथ्यावर जिरेटोप, हातातलं कडं, कानातली कुंडलं, शोभून दिसणारी कोरीव दाढी, कमावलेली आखीव रेखीव शरीरयष्टी, शोभणारी राजवस्त्रे, पायातल्या मोजड्या असं मोहवून टाकणारं जसं रूप होतं त्याहून ही मोहून टाकणारं महाराजांचं अंतरंग होतं".
आणि ते अंतरंग म्हणजे उर्जातत्व. महाराज साधक होते. योगी होते. महायोगी होते. 'तो भगव्या धुंडीचा जोगी' हे कवी उनाड यांचे शब्द मला इथे समर्पक वाटतात. जोगी होते महाराज. महाराजांची एक ध्यानमग्न  मूर्ती कर्नाटकातल्या एका ठिकाणी पाहायला मिळते.  अंतरंगातल्या उर्जातत्त्वाशी अखंड एकरूप असे ते जगले. " क्षत्रिकुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय" म्हटलं की प्रखर ऊर्जा आजही  आपल्यामध्ये सळसळते याचं कारण तेच.

अशी माणसं माणसं नसतातच. साक्षात ऊर्जेचं प्रकट रूप असतात. आणि "धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे" या भगवंतांच्या उक्तीप्रमाणे पुन्हा एकदा उर्जतत्वाची, न्यायाची, समानतेची, मानवतेच्या धर्माची स्थापना करायला पुन्हा पुन्हा या न त्या रुपात जन्म घेतात. अन् अशावेळी ' परित्राणाय साधुनाम, विनाशाय च दुष्कृतानाम' ही उक्ती सार्थ ठरवत चांगल्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करतात अन दुर्जनांचा अगदी संहार घडवून आणतात..

खरंच...
"आम्ही आतल्या शत्रूंशी लढतो, तुम्ही बाहेरच्या शत्रूंशी लढा" हे तुकोबारायांचं वचन खरं ठरवत एका जोग्या सारखे अंतरीच्या अखंड ऊर्जेने महाराज बाहेरच्या नादान शत्रूंशी एक महाभारत अत्यंत स्थिरतेने ऊर्जेने अन आपल्याला काय ऊभ करायचंय या अखंड जाणीवेने लढत राहिले. त्यांचं वैर अधर्माशी होतं. म्हणून तर माणूस म्हणून शत्रूचाही त्यांनी सन्मानच केला.
त्यांचं जीवन हे धगधगतं अग्निकुंड आहे. ते आपल्याला ऊर्जा देतच राहील. देतच राहील. आणि जेव्हा जेव्हा अधर्म माजेल..महाराज पुन्हा पुन्हा या न त्या रुपात अवतरत राहतीलच....!!

छाती केसरीची दृष्टी गरुडाची गती हरणाची,
ऐसा राजा
देह राजीयाचा प्राण योगियाचा मूळ कैलासाचे ,
ऐसा राजा
 मातीसाठी युद्ध मांडतो रक्त सांडतो ,
ऐसा राजा
 जीव वाहतो जीव लावतो जीव रक्षितो,
ऐसा राजा

अशा आपल्या हृदय सिंहासनावर विराजमान असलेल्या राजाला मुजरा मुजरा मुजरा....!!!!!
✨
शिव राज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!!


2 comments: